डॉक्युमेंटरी येण्याआधी जयपूर पिंक पँथर्सची खास टीम मिटिंग

प्रो कबड्डी लिगमधील संघ जयपूर पिंक पँथर्सच्या प्रवासावर लवकरच ‘सन्स ऑफ द सॉइल’ नावाची डॉक्युमेंटरी येत आहे. या डॉक्युमेंटरीचा टिझर नुकताच युट्युबवर प्रसारीत करण्यात आला. येत्या ४ डिसेंबरला ही डॉक्युमेंटरी अमेझॉन प्राईमवर प्रसारीत होणार आहे.
डॉक्युमेंटरी टिझर आल्यानंतर जयपूर पिंक पँथर्स संघाची एक खास टीम मिटींग नुकतीच पार पडली. संघमालक अभिषेक बच्चन, कोच श्रीनिवास रेड्डी, कर्णधार दीपक हुडा आणि संघाचे प्रमुख खेळाडू अमित हुडा, संदीप धुल, निलेश साळुंके, दीपक नरवाल हे या ऑनलाइन मिटिंगसाठी उपस्थित होते.
या मिटिंगमध्ये अभिषेकने आपल्या संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने खेळाडूंचे सध्याचे सरावाचे वेळापत्रक, त्यांनी कोणत्या स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला याबद्दल माहिती घेतली. याबरोबरच खेळाडूंच्या घरच्या लोकांची आस्थेने चौकशीदेखील केली. यावेळी संघाचे प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी ह्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून संघाचा प्रवास जगासमोर आणल्याबद्दल अभिषेकचे आभारही मानले.
या खास मिटिंगचा व्हिडिओ अमेझॉन प्राईमच्या युट्युब चॅनेलवर पाहता येईल.