प्रो कबड्डीकडून कबड्डी रसिकांसाठी खुशखबर

करोनामुळे कबड्डीच्या सगळ्या स्पर्धा सध्या बंद आहेत. सरकारने अद्यापही कोणत्याही स्पर्धांना परवानगी दिलेली नाही.कधी एकदा स्पर्धा सुरू होतात याकडे लक्ष लावून बसलेल्या कबड्डी रसिकांसाठी आता मात्र एक खुशखबर आहे. प्रो कबड्डी लीगतर्फे आता बियाँड द मॅट या कार्यक्रमाचा दुसरा हंगाम येत आहे.
प्रो कबड्डी लीगने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ अपलोड करत याची माहिती दिली आहे. बियाँड द मॅट या कार्यक्रमाचा दुसरा हंगाम रविवार ४ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.
या कार्यक्रमात प्रो कबड्डी लीगतर्फे विविध कबड्डी खेळाडूंना निमंत्रित केले जाते. इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून या खेळाडूंशी संवाद साधला जातो. यातून प्रेक्षकांना खेळाडूंचे आवडते खेळाडू, आवडते संघ, चित्रपट, अभिनेते, त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणांबद्दल माहिती मिळते. या कार्यक्रमाच्या पहिल्या हंगामात अनुप कुमार, दीपक हुडा, रोहित कुमार, परदीप नरवाल, नवीन कुमार गोयत सारख्या खेळाडूंनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.आता दुसऱ्या हंगामात कोणते खेळाडू या कार्यक्रमात येणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.