कबड्डी लवकरच ऑलिंपिकमध्ये जाणार – दीपक हुडा
Kabaddi will soon make it's way to the Olympics - Deepak Hooda

अर्जुन पुरस्कार विजेता भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा याने कबड्डीच्या ऑलिंपिकमधील समावेशाबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. कबड्डीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता लवकरच कबड्डी ऑलिंपिकमध्ये पोहोचेल असा विश्वास वाटतो असे दीपक टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला.
“यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये कबड्डीशी निगडित तीन जणांचा समावेश होता. यावरून कबड्डीला राष्ट्रीय पातळीवर महत्व मिळत आहे हे दिसून येते. याबरोबरच प्रो कबड्डीलासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. जागतिक पातळीवर इतर देशदेखील उत्कृष्ट दर्जाची कबड्डी खेळत आहेत.यामुळे लवकरच कबड्डीचा समावेश ऑलिंपिकमध्ये होईल याबाबत शंका नाही.” असे दीपक म्हणाला.
दोन वर्षांपूर्वी इराणच्या संघाने भारताला आशियाई स्पर्धांमध्ये पराभूत केले होते. या निमित्ताने कबड्डीवर असलेल्या भारताच्या वर्चस्वाला आव्हान मिळाले होते. याबाबत बोलताना दीपक म्हणाला,
“एखाद्या खेळाची प्रगती होतेय असे तेव्हाच म्हणता येते जेव्हा अनेक देश त्यामध्ये प्राविण्य मिळवतात. जेव्हा हे शक्य होईल तेव्हाच कबड्डीचा ऑलिंपिकमधील प्रवेश सुकर होईल. इराण, दक्षिण कोरिया यांच्यासारखे देश कबड्डीला चांगले पाठबळ देत आहेत ही कौतुकाची बाब आहे.”