दहीहंडीला फाटा देत प्रो कबड्डी पंचाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन 

Pro Kabaddi Referee ditched Dahi Handi to organize a blood donation drive

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले चार महिने महाराष्ट्र राज्य आणि देशात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कुठे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने खबरदारी म्हणून सरकारने सार्वजनिक उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचाच फटका मुंबईमधील सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला बसला आहे. करोनामुळे अनेक गोविंदा पथकांचे अर्थकारण यामुळे बिघडले आहे.
असे असले तरी अनेक गोविंदा पथकांनी परिस्थितीचे भान राखत यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गोविंदा पथकांचे नेतृत्व करणाऱ्या दहीहंडी समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईमधील स्वस्तिक दहीहंडी पथकानेदेखील यावर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. याऐवजी या पथकाने रक्तदान शिबीर आयोजित करून आपले सामाजिक भान दाखवून दिले आहे.
यामध्ये पथकाच्या संचालिका आणि प्रो कबड्डी पंच आरती बारी यांची मोठी भूमिका आहे. बारी यांनी यावेळी प्रतीकात्मक दहीहंडीचे पूजन केले. रक्तदान शिबिराबरोबरच बारी यांच्या हस्ते गोरेगाव पोलीस ठाण्यातील करोना योद्धे असेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
स्वस्तिक महिला दहीहंडी पथक २००५ पासून अस्तित्वात असून २०१४ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे देखील दहीहंडीचे थर लावले होते. बारी या महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीच्या खजिनदार म्हणूनही काम करतात. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत दहीहंडी उत्सव टाळून सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल बारी यांचे कबड्डी क्षेत्रातून कौतुक होत आहे.