विश्वचषक जिंकून आठ वर्षे झाली तरी तिला अजून नोकरी नाही…
Eight years after winning the World Cup, she still doesn’t have a job

पटनामध्ये २०१२ साली झालेला महिला कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची ती सदस्य होती. विश्वचषक जिंकला म्हणजे सरकारकडून नोकरी मिळेल अशी तिला आशा होती. मात्र दोन वर्षात काहीच झाले नाही. त्यानंतर २०१४ साली आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय महिला संघातही ती होती. किमान आतातरी सरकारी नोकरी मिळेल असे तिला वाटले. दरम्यान केंद्रात आणि राज्यात सरकारही बदलले. त्यामुळे तरी काही होण्याची तिला अपेक्षा होती मात्र ती देखील फोल ठरली. आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकून आता ६ वर्षे लोटली तरी हरयाणातील आदमपूर दाढी खेड्यातील कब्बडी खेळाडू प्रियांका अजूनही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रियांकाने आजवर जवळपास ११ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये हरियाणा सरकारकडून तिला मानाचा भीम पुरस्कारही जाहीर झाला होता. आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सरकारकडून अ श्रेणीची नोकरी दिली जाते. प्रियांका मात्र सुवर्णपदक जिंकल्यावर सहा वर्षे उलटून गेल्यावरही सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहे.
Related Posts
प्रियांकाची संघसहकारी कविता देवी हिची नुकतीच हरयाणा सरकाकडून उपसंचालक पदावर नेमणूक करण्यात आली. तिलाही यासाठी कोर्टात दाद मागावी लागली होती. कविताला नोकरी मिळाल्याचे कळताच आता प्रियांकाला पुन्हा एकदा नोकरीची आशा लागली आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकूनही प्रियांकाला नोकरी नसल्याने तिच्या गावात ती चर्चेचा विषय बनली आहे. नोकरी नसल्याने कदाचित तिला बघून आता गावातले लोक आपल्या मुलींना खेळात भाग घेण्यास प्रोत्साहन देणार नाहीत अशी भीती प्रियांकाला वाटते.
प्रो कबड्डी लीगद्वारे आयोजित वूमन्स कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आईस दिवाज संघात प्रियांकाचा समावेश होता. दुर्दैवाने सामन्याच्या आधी एक दिवस दुखापत झाल्याने तिला खेळता आले नव्हते. सध्या ती भारतीय महिला संघ आणि हरयाणा संघाची कर्णधार आहे.