मोठी बातमी – आशियाई बीच कबड्डी स्पर्धांची नवी तारीख जाहीर 

Big News – New Dates For The Asian Beach Kabaddi Championships Announced

यावर्षीच्या अखेरीस चीनमधील सान्या शहरात होणाऱ्या आशियाई बीच स्पर्धा आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये होतील.  आशियाई ऑलिंपिक परिषदने याबाबत माहिती दिली आहे. यावर्षी नोव्हेंबर २८ ते डिसेंबर ६ दरम्यान या स्पर्धा पार पडणार होत्या. मात्र करोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता या स्पर्धा पुढील वर्षी २ ते १० एप्रिल दरम्यान पार पडतील.
यावर्षी चीनमध्ये फक्त २०२२ मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठीच्या  चाचणी स्पर्धांना सरकारने परवानगी दिली आहे. आशियाई ऑलिंपिक परिषदेने दिलेल्या वृत्तानुसार, “चीनची ऑलिंपिक समिती आणि सान्या आशियायी बीच स्पर्धांची आयोजक समिती यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये खेळाडू, कर्मचारी आणि प्रेक्षक यांची सुरक्षा जास्त महत्वाची आहे”
या स्पर्धांच्या पात्रतेचे निकष तसेच इतर तांत्रिक बाबी याबाबत आयोजकांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल असे परिषदेकडून सांगण्यात आले. या स्पर्धेत ४० हुन अधिक देशांतून जवळपास २००० खेळाडू सहभागी होणार आहेत.