शॉर्ट्स घालतात म्हणून गावकरी नाक मुरडायचे, आता कौतुकाला मर्यादा नाही!
Once criticised for wearing shorts, now there is no limit to appreciation

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील कुरवाई तालुक्यात बरूअल नावाचे छोटेसे गाव आहे. मध्यप्रदेशातील इतर गावांसारखंच हे एक गाव. मात्र गावाची ओळख गावातील मुले नसून मुली आहेत. चक्रावलात ना? या गावातल्या जवळपास ११ मुलींनी १४ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. मध्यप्रदेश राज्याच्या कबड्डी संघात सातपैकी ३ मुली याच गावातल्या असतात. गावातील ३६ मुली आजतागायत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये खेळल्या आहेत.
त्याच झालं असं की, २०१८ मध्ये कुरवाईमध्ये एक उन्हाळी शिबीर झाले होते. बरूअल गावातल्या काही विद्यार्थिनी या शिबिराला उपस्थित होत्या. या शिबिरात त्यांना कबड्डी खेळण्याची प्रेरणा मिळाली. परत आल्यावर या मुलींनी आपले शिक्षक राम मनोहर सिंग राजपूत यांच्याकडे कबड्डी खेळण्याची इच्छा व्यक्त केली. गावात कबड्डी खेळण्यासाठी मॅट असणे शक्य नव्हतेच. मुलींनी मातीवर कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. हळूहळू तालुका आणि जिल्हा स्तरावर या मुलींची कामगिरी चांगली होऊ लागली. त्यांची ही कामगिरी पाहून जिल्हा क्रीडा आणि युवक कल्याण विभागाने त्यांना सरावासाठी मॅट उपलब्ध करून दिली. या मॅटवर सराव करत मुलींनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपली छाप पाडायला सुरुवात केली.
Related Posts
१९ वर्षाखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मध्यप्रदेशच्या संघात सातपैकी तीन खेळाडू बरुअल गावातील होत्या यावरून या मुलींची कामगिरी लक्षात यावी. २०१८ पासून या गावातील मुलींनी तालुका, जिल्हा तसेच राज्यपातळीवरील विविध स्पर्धांमध्ये ६० हुन अधिक चषक जिंकले आहेत. या मुली रोज दोन तास सराव करतात. स्पर्धांच्या काळात हाच वेळ चार तास होतो.
एकवेळ अशी होती की शॉर्ट्स घालून कबड्डी खेळणाऱ्या या मुलींना गावातील लोक नावे ठेवत. कबड्डी हामुलांचा खेळ आहे असे ऐकवत. मुलींच्या घरच्या लोकांनाही याचा त्रास होत असे. मात्र एकदा जिंकायला सुरुवात केल्यावर हेच गाववाले आता मुलींना कौतुकात न्हाऊ घालतात, आपल्या मुलींनाही कबड्डी खेळण्यासाठी पाठवतात. एवढेच नाही तर गावातील मुलांना तुम्हीसुद्धा मुलींसारखं काहीतरी करून दाखवा असे सांगितले जाते.