यू मुंबाच्या फिटनेस ट्रेनरचा विनयभंग – मुंबई पोलिसात तक्रार दाखल

U Mumba fitness trainer faces cyber molestation - complaint filed with Mumbai Police

करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रो कबड्डीतील संघ यू मुंबा विविध उपक्रम राबवत आहे. याचाच भाग म्हणून यू मुंबाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह सेशन केले जातात.या सेशनमध्ये यू मुंबाचे फिटनेस प्रशिक्षक चाहत्यांसाठी फिटनेस सेशन करत असतात. अबीर अरसीवाला यांच्या कालच्या सेशनमध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली. याबाबत यू मुंबाने मुंबई पोलिसांना कळवून दोषीला शासन करावे अशी विनंती केली आहे.

 

अबीर अरसीवाला या यू मुंबाच्या फिटनेस प्रशिक्षक आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांचे अनेक सेशन इन्स्टाग्रामवर पार पडले. कालच्या सेशनमध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली. अरसीवाला यांचा हा सेशन सुरू असताना एका इन्स्टाग्राम युजरने त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट केली. ही कॉमेंट वाचून अरसीवाला यांनी लाईव्ह सेशन मध्ये थांबवून याबद्दल निराशा व्यक्त केली. फिटनेस प्रशिक्षक भले तो पुरुष असो वा स्त्री, चाहत्यांनी त्यांचा आदर केला पाहिजे.कोणतीही आक्षेपार्ह कॉमेंट करण्याआधी विचार करावा असे त्या म्हणाल्या.

 

या घटनेनंतर यू मुंबा संघ व्यवस्थापनाने ट्विट करत मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी killer_pandit_209 या इन्स्टाग्राम युजरवर कारवाई करण्याची विनंती केली.

 

यानंतर यू मुंबाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना सायबरबुलिंग, ट्रोलिंग करणे चुकीचे असून यू मुंबा व्यवस्थापन याबाबत कडक कारवाई करू शकते असा इशारा दिला.