पाकिस्तानचा अधिकारी म्हणतोय, “कबड्डी खेळाडूंना फॉर्ममध्ये यायला सहा महिने लागणार”

"It will take six months for kabaddi players to return to form," says Pakistan official.

करोनामुळे कबड्डीच्या सगळ्याच स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. कबड्डी खेळताना खेळाडू सतत एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने या स्पर्धा कधी सुरु होतील याबद्दल अजून स्पष्टता नाही. अशातच पाकिस्तान कबड्डी फेडरेशनचे सचिव जनरल मोहम्मद सरवार राणा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
द न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सरवार राणा म्हणाले, “कबड्डी खेळाडूंना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास आणि आधीच फिटनेस कमावण्यास कमीतकमी सहा महिने लागतील. करोनामुळे एक विचित्र स्तिथी निर्माण झाली असून क्रीडा क्षेत्राला त्याचा जास्त फटका बसला आहे. कबड्डीमध्ये खेळाडू एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने कबड्डीची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा करोना आटोक्यात येईल.”
“जे खेळाडू दीर्घकाळ कबड्डी खेळत असून आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांना पुनरागमन करणे अवघड असेल. करोनामुळे दीर्घकाळ खेळापासून लांब असल्याने या खेळाडूंना आपला फिटनेस पुन्हा कमावण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. काहीजणांना कदाचित यामध्ये असलेला रस कमी झालेला असेल. म्हणून त्यांना खेळत राहणे अवघड जाईल.”
पाकिस्तान कबड्डी फेडरेशनच्या पुढील योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले, “सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आम्ही खेळाडूंसाठी एक सराव शिबिर आयोजित करणार आहोत. मात्र सध्या कोणतीही स्पर्धा भरविण्याचा आमचा इरादा नाही. आमचे प्रशिक्षक खेळाडूंच्या संपर्कात राहूनत्यांच्या फिटनेसवर लक्ष देत आहेत. मात्र सामान्यांसाठीचा फिटनेस हा वेगळाच असतो आणि त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते.”
मोहम्मद सरवार राणा हे पाकिस्तान कबड्डी संघाचे माजी कर्णधार असून सध्या आशियाई कब्बडी फेडरेशनचे सचिव आहेत.