कबड्डी खेळाडूंसाठी सुवर्णसंधी – पालघर कबड्डीकडून वेबिनारचे आयोजन 

Golden Opportunity for Kabaddi Players – Palghar Kabaddi hosting webinar series

करोनामुळे सध्या सगळ्याच क्रीडास्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. आयपीएलसारख्या मोठ्या लीग भारताबाहेर सुरु होणार आहेत. कबड्डीसारखे खेळ ज्यात खेळाडू सतत एकमेकांच्या संपर्कात येतात याबाबत मात्र अजूनही फारशी स्पष्टता नाही. यामुळेच प्रो कबड्डी लीगपासून भारतातील सगळ्याच छोट्या मोठ्या कबड्डी स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. असे असले तरी कबड्डी खेळाडू घरी राहूनच आपला फिटनेस राखण्यावर भर देत आहेत. अशाच कबड्डी खेळाडूंसाठी एक चांगली संधी चालून आली आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनने कबड्डी खेळाडूंसाठी एका वेबिनार मालिकेचे आयोजन केले आहे. आधुनिक कबड्डी विषयाला केंद्रस्थानी ठेवून खेळातील गती, तंत्र यावर या वेबिनार मालिकेमध्ये भर दिला जाईल. या मालिकेतील ‘ स्ट्रेंग्थ अँड कंडीशनिंग ‘ विषयावरील पहिला वेबिनार २ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजता पार पडणार आहे. या वेबिनारमध्ये महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या तसेच प्रो कब्बडी समालोचक सौ.गौतमी राऊत आरोसकर आणि स्ट्रेंग्थ अँड कंडीशनिंग कोच अमोघ पंडित हे मार्गदर्शन करणार आहेत.

पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन या वेबिनार मालिकेत एकूण १२ वेबिनार आयोजित करणार असल्याचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे निमंत्रित सदस्य मनोज ठाकूर यांनी सांगितले. याअगोदर पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनने पंच शिबिराचे आयोजन केले होते. याबरोबरच १५ जुलै रोजी कबड्डी दिवस देखील साजरा करण्यात आला होता.