तिने खेळू नये म्हणून लोकांनी मैदानात खिळे टाकले, ती मात्र…

People put nails on the field so that she would not play, but she...

गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे कबड्डीतील वर्चस्व जगजाहीर आहे. भारताने आजतागायत झालेले सगळे विश्वचषक जिंकून हे वारंवार दाखवून दिले आहे. प्रो कबड्डीची सुरुवात झाल्यापासून तर कबड्डीला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. यामध्ये महिलांची कबड्डीसुद्धा मागे राहिलेली नाही. महिलांच्या कबड्डी सामन्यांनासुद्धा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी आजही भारतातील महिला कबड्डी खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या लेखात अशाच एका महिला खेळाडूच्या संघर्षावर आपण नजर टाकणार आहोत. एक वेळ तरी अशी होती की तिने खेळू नये म्हणून लोकांनी मैदानात अक्षरशः खिळे टाकले. ती मात्र डगमगली नाही. पुढे जाऊन तिने भारताकडून आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डीत सुवर्णपदक मिळवले. ही खेळाडू म्हणजे बिहारची शमा परवीन.

 

 

 

 

 

 

 

बिहारच्या एका छोट्याश्या गावात वाढलेल्या शमाला पहिला विरोध घरच्यांकडूनच झाला. मुस्लिम समाजाची असल्याने मुळात कबड्डीसारखा खेळ खेळणे हेच शमासाठी एक मोठे आव्हान होते. तिच्या स्वतःच्या आजीनेच तिच्या कबड्डी खेळण्याला आधी विरोध केला. कब्बडी खेळताना शॉर्ट आणि टी शर्ट घालून ही मुलगी आपल्या घराण्याचे नाव खराब करेल असे आजीला वाटे. तिच्या चुलत्याने तर यावरही कडी करत तिला जीन्स घालून घरी यायला मनाई केली. शमाचे आईवडील फरीदा आणि इलियास मात्र खंबीरपणे आपल्या मुलीसोबत उभे राहिले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही ह्या जोडप्याने मुलीला काही कमी पडू दिले नाही. वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहिले पण मुलीच्या डाएटमध्ये कसली कसर सोडली नाही.

 

 

 

 

 

 

 

घरच्यांचा विरोध सांभाळते आहे तोवर शमाला गावातील लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. गावातील लोकांनी विविध प्रकारे तिला त्रास दिला. कधी शमा खेळत असे त्या मैदानात खिळेच टाकले, कधी काचांचे तुकडे टाकले. काहीजणांनी तर हद्द केली आणि मैदानात अक्षरशः शौचाला बसले. लोकांच्या ह्या त्रासामुळे शमाला १०-१५ वेळा आपली सरावाची जागा बदलावी लागली.
लवकरच शमा विविध स्पर्धामध्ये भाग घेऊ लागली. बिहारमधील आरा येथे २००७ मध्ये झालेल्या एका स्थानिक स्पर्धेत शमाचा संघ जिंकला. याचे बक्षीस म्हणून शमाला १०० रुपये मिळाले.शमामध्ये गुणवत्तेची कमी नव्हती. भोजपुरला २०१० मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने आपली छाप पाडली.
राज्य कबड्डी संघाने शमाचा सन्मान केला. वर्तमानपत्रांमध्ये तिचे फोटो छापून आले. लवकरच तिने ज्युनिअर नॅशनल आणि सिनियर नॅशनल स्पर्धांमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धामधली तिची कामगिरी पाहून लवकरच भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी तिची निवड झाली. या शिबिरानंतर शमाची भारतीय संघातही निवड झाली. इराणमध्ये पार पडलेल्या आशियाई कबड्डी स्पर्धांमध्ये भारतीय महिला संघाने कोरियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. या विजयी संघामध्ये शमासुद्धा होती.

 

 

 

 

 

सुवर्णपदक जिंकून आपल्या गावी परत आल्यावर जे घडले त्यावर शमाचा विश्वासच बसला नाही. ज्या लोकांनी तिच्या कबड्डी खेळण्याला विरोध केला होता, तेच आज हारतुरे घेऊन तिच्या स्वागतासाठी उभे होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः शमाचा सत्कार केला आणि शमा बिहारची शान आहे अशा शब्दांत तिचे कौतुक केले.शमाकडून प्रेरणा घेत तिच्या धाकट्या बहिणी हिना आणि सुलताना यांनी सुद्धा कबड्डीच खेळायचे ठरवले. हिनासुद्धा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बिहारकडून खेळते आहे
ज्या इराण देशात तिने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले त्याच इराण देशाचा आणि पाकिस्तानचा सुद्धा महिला संघ या स्पर्धेत सहभागी होता. मग भारतातच मुस्लिम मुलीला खेळण्यासाठी विरोध का? असा सवाल शमाने केला होता. ज्या मुस्लिम समाजात मुलींनी डोक्यापासून पायापर्यंत सगळे अंग झाकून घेणे अपेक्षित असते त्याच समाजातील शमाने ह्या सगळ्याला फाटा देत आशियाई सुवर्णपदकापर्यंत मारलेली मजल निश्चितच कौतुकास पात्र आहे.