परदीप करणार अजून विक्रम

Pardeep well on his way to set another PKL record

परदीप नरवाल आणि विक्रम हे नातं कबड्डी चाहत्यांना नवे नाही. प्रो कबड्डीत खेळायला लागल्यापासून परदीपने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वाधिक गुण, सर्वाधिक सुपर रेड्स, सर्वाधिक सुपर टेन असे अनेक विक्रम आपल्या नावावर करत त्याने ‘रेकॉर्डब्रेकर’ हे नाव कमावले.

प्रो कबड्डीच्या सात हंगामानंतर आता प्रेक्षकांना आठव्या हंगामाची प्रतिक्षा आहे. करोनामुळे सध्यातरी हा हंगाम होणार किंवा नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. असे असले तरी प्रो कबड्डीच्या पुढच्या हंगामात परदीपला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे.

प्रो कबड्डी इतिहासात १००० यशस्वी रेड्स करणारा पहिला खेळाडू हा मान मिळवण्याची संधी परदीपला आहे. परदीपने आजपर्यंत एकूण ८८० यशस्वी रेड्स केल्या आहेत.परदीप हा कुठल्याही संघाकडून खेळला तरी तो एक प्रमुख रेडर म्हणूनच खेळतो. प्रत्येक हंगामात तो साधारणपणे ४००-४५० रेड्स करतो. यामध्ये त्याची यशस्वी रेड्सची टक्केवारी ६० टक्क्यांहून अधिक आहे. परदीपला १००० यशस्वी रेड्सचा टप्पा गाठण्यासाठी १२० रेड्सची गरज आहे. त्याच्या यशस्वी रेड्सची टक्केवारी पाहता परदीप निश्चितच हा विक्रम आपल्या नावावर करू शकेल.

यशस्वी रेड्सच्या संख्येत परदीप पाठोपाठ राहुल चौधरीचा नंबर लागतो. त्याने आजवर एकूण ७८८ यशस्वी रेड्स केल्या आहेत. म्हणजे १००० यशस्वी रेड्सचा टप्पा गाठण्यासाठी राहुलला २१२ रेड्सची गरज आहे. मात्र राहुलची यशस्वी रेड्सची टक्केवारी ४७ टक्क्यांच्या आसपास आहे. प्रत्येक हंगामात तो साधारणपणे ३०० रेड्स करतो. हा टप्पा गाठण्यासाठी आगामी हंगामात त्याला आपली यशस्वी रेड्सची टक्केवारी ७० टक्क्यांवर न्यावी लागेल. राहुलचा फॉर्म पाहता अशी कामगिरी एकाच हंगामात करणे सध्यातरी शक्य होईल असे वाटत नाही.

यामुळे पुन्हा एकदा परदीपच रेकॉर्ड ब्रेकर ठरणार हे मात्र निश्चित आहे.