पाच खेळाडू ज्यांनी पदार्पणातच राडा घातला
Five players with powerful debuts

प्रो कबड्डी लीगने भारतातील आणि भारताबाहेरील अनेक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या लीगमुळे अनेक तरुण खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. यातल्या काही तरुण खेळाडूंनी प्रो कबड्डी लीगमधील आपल्या प्रदर्शनाने सर्वांनाच चकित केले. नवीन कुमार गोयत, सिद्धार्थ देसाई ही त्यातलीच काही नावे. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातही अशाच काही तरुणांनी कबड्डी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रो कबड्डीचा पहिलाच हंगाम खेळणाऱ्या अशा खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख.
१. पंकज मोहिते – पुणेरी पलटण
पुणेरी पलटणचा आघाडीचा खेळाडू नितीन तोमर जायबंदी झाल्याने पंकजला संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचा पंकजने पुरेपूर फायदा उठवला. या हंगामात खेळलेल्या १६ सामन्यांत पंकजने ११३ गुण मिळवले. नितीनच्या अनुपस्थितीत मनजीत हा पलटणचा आघाडीचा रेडर म्हणून खेळत होता. पंकजने त्याला योग्य साथ दिली. पुणेरी पलटणचा या हंगामातील प्रवास प्राथमिक फेरीतच आटोपला असला तरी पंकजच्या रुपात त्यांना एक चांगला रेडर मिळाला यात शंका नाही.
२. व्ही अजित कुमार – तमिळ थलायव्हाज
अजय ठाकूर, राहुल चौधरी, मनजीत चिल्लर यांच्यासारखे नावाजलेले खेळाडू संघात असताना एखाद्या नवख्या खेळाडूने स्वतःची छाप सोडणे तसे अवघड काम आहे. व्ही अजित कुमारने मात्र ते करून दाखवले.
बऱ्याचदा असं व्हायचं की तमिळ
थलायव्हाजचे सगळे गडी बाद होऊन एकटा अजित मैदानात उरायचा. अजित मात्र मोठया तडफेने प्रतिपक्षात जाऊन पॉईंट काढून संघाचा ऑल आऊट वाचवायचा. या हंगामात अजितने १९ सामन्यांत १२१ गुण मिळवले. दडपणाच्या स्थितीत पॉईंट घेण्याची अजितची क्षमता अनेकांची मने जिंकून गेली.
३. विनय तेवातीया – हरयाणा स्टीलर्स
हरयाणा स्टीलर्स संघाला सातव्या हंगामात गवसलेले एक रत्न म्हणून विनयचा उल्लेख करावा लागेल. विकास कंडोला, प्रकाश राय यांना साथ देताना विनयने आपली चांगलीच छाप सोडली. विनयने २३ सामन्यांत १२९ गुण मिळवले. त्याने हरयाणा कडून खेळलेल्या पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीने प्रभावित होऊन संघ व्यवस्थापनाने तिथून पुढच्या प्रत्येक सामन्यात विनयला संघात सामाविष्ट केले. हंगामाच्या शेवटी तो हरयाणा स्टीलर्सकडून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या रेडर्सच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
४. सुमित – यूपी योद्धा
प्रो कबड्डीकडून राबवल्या जाणाऱ्या न्यू यंग प्लेयर उपक्रमातून अनेक चांगले खेळाडू पुढे आले आहेत. सुमितसुद्धा याच उपक्रमातून युपी योद्धा संघाला सापडलेला हिरा आहे.सुमितने आपल्या पहिल्याच हंगामात २२ सामन्यांत ७७ टॅकल पॉईंट्स मिळवले. कर्णधार नीतेश कुमार बरोबर त्याची चांगली जोडी जमली. हंगामात एकूण ७ हाय फाईव्ह मिळवताना त्याने आपल्या कर्णधारालासुद्धा मागे टाकले.
५.मोहंमद नबिबक्ष – बंगाल वॉरियर्स
बंगाल वॉरियर्सने सातव्या हंगामाच्या सुरुवातीला बऱ्याच जुन्या खेळाडूंना संघातून डच्चू दिला होता. याचवेळी संघात नवख्या नबिबक्षला जागा देऊन सगळ्यांना आश्चर्यचा धक्कासुद्धा दिला. नबिबक्षने मात्र अंतिम सामन्यात जोरदार कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली. बंगालकडून या हंगामात खेळलेल्या २३ सामन्यांत त्याने १२२ गुण मिळवले. यातले ९२ रेड पॉईंट्स तर ६५ टॅकल पॉईंट्स होते. यावरून नबिबक्षची अष्टपैलू कामगिरी ध्यानात येते. संघाचा नियमित कर्णधार मनिंदर सिंग जखमी झाल्यावर नबिबक्षने उपांत्य आणि अंतिम फेरीत संघाचे नेतृत्व करत आपल्यातील नेतृत्वगुणांची चुणूकही दाखवून दिली.