वडील होते हॉकी खेळाडू, मुलगा घालतोय मॅटवर राडा!
Father was a hockey player, the son plays in Pro Kabaddi

त्याचे वडील राष्ट्रीय हॉकी खेळाडू होते. त्याने मात्र हॉकीकडे न वळता करता कबड्डीच्या मॅटची निवड केली. हा खेळाडू आहे नागपूरचा शुभम पालकर. नागपूरच्या मराठा लान्सर अकादमीपासून सुरू झालेला शुभमचा प्रवास आता थेट प्रो कबड्डीपर्यंत येऊन पोहोचला आहे. शुभम प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात गुजरातकडून तर त्याआधी दबंग दिल्लीकडून खेळला.
भारतासारख्या देशात जिथे मुले खेळण्याची सुरुवात क्रिकेतपासून करतात तिथे शुभम मात्र वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शुभम कबड्डी खेळू लागला. त्याचे आजोबा एक उत्तम कबड्डी खेळाडू होते. शुभमला कबड्डीची देणगी कदाचित त्यांच्याकडूनच मिळाली असावी असे शुभमचे वडील म्हणतात. सातवीत असताना शुभमने आपली शाळा गायत्री कॉन्व्हेंटसाठी राष्ट्रीय पातळीवर १४ वर्षाखालील स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
पोरगं एवढा जीव काढतय बघून शुभमच्या वडिलांनी एक बस कंडक्टर असूनही त्याला कशाची कमी पडू दिली नाही. स्पर्धेसाठी त्याच्याबरोबर प्रवास करणे असो, त्याचा खुराक पाळणे असो की त्याच्यासाठी व्यायामाचे साहित्य घेणे असो त्याच्या वडिलांनी हर तऱ्हेने आपल्या मुलाची कबड्डीची हौस पूर्ण केली.
एकीकडे स्थानिक पातळीवर अनेक स्पर्धा जिंकत असताना शुभमला प्रो कबड्डीचे वेध लागले होते. त्याच्या चांगल्या कामगिरीने त्याने अनेक संघाचे लक्ष वेधून घेतले होते. अखेरीस प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामात दबंग दिल्लीने शुभमला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. या हंगामात त्याने दिल्लीकडून ८ सामने खेळले. पुढच्या हंगामात गुजरातकडून त्याने चार सामने खेळले.यावर्षी मार्च महिन्यात जयपूर येथे पार पडलेल्या ६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्याने विदर्भाकडून सर्वाधिक गुण नोंदवले होते. प्रो कबड्डी लीगच्या येत्या हंगामात शुभम कोणत्या संघाकडून खेळतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.