कबड्डी हा शब्द पहिल्यांदा ऐकल्यावर एक वर्षात तो खेळला थेट विश्वचषक

Within a year of hearing the word Kabaddi, he played the World Cup

एखादा खेळ आपण कारकीर्द म्हणून निवडला की त्यात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची अशी प्रत्येक खेळाडूची मनिषा असते. कबड्डी खेळाडू म्हटलं की त्यांना आपल्या देशासाठी कबड्डी विश्वचषक खेळायचा असतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका खेळाडूची गोष्ट सांगणार आहोत ज्याने कबड्डी हा शब्द पहिल्यांदा ऐकल्यावर फक्त एक वर्षात आपल्या देशासाठी कबड्डीचा विश्वचषक खेळला. तो खेळाडू म्हणजे दक्षिण कोरियाचा डाँग जिऑन ली.

हा नेमका काय किस्सा आहे याबाबद्दल डाँगने एकदा माहिती दिली होती. प्रो कबड्डी मधील दुसरा कोरियन खेळाडू जांग कुन ली याला आता बरेचसे कबड्डी चाहते ओळखतात. डाँग आणि जांग एकाच विद्यापीठात शिकायचे. एक दिवस जांगने डाँगला पाहिले आणि म्हणाला,

“तुला कबड्डी या खेळाबद्दल काही माहिती आहे का?”

“मी अर्थातच नाही म्हटले. ते ऐकताच जांगने मला मी कबड्डी खेळली पाहिजे असे सुचवले. माझ्या उंचीचा आणि मजबूत शरीरयष्टीचा मला कबड्डी खेळताना उपयोग होईल असे त्याने मला सांगितले.जांगला मी माझा कबड्डी गुरू मानतो.”

“जांगचे ऐकून मी कबड्डी खेळू लागलो. लवकरच माझी कोरिया संघात निवड झाली.पहिल्यांदा मी बिच एशियन कबड्डी स्पर्धेत माझ्या देशासाठी खेळलो.त्यानंतर लगेच २०१६ च्या कबड्डी विश्वचषकात माझी कोरिया संघात निवड झाली. या विश्वचषकात आम्ही भारताला हरवले हा माझ्यासाठी अतिशय खास क्षण होता.”

डाँगने प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात तमिळ थलायवाजकडून पदार्पण केले. सहाव्या हंगामात तो गुजरातकडून तर सातव्या हंगामात तो यु मुंबाकडून खेळला.