बुलेट मिळवायची म्हणून त्याने जिंकले सुवर्णपदक 

He won the gold medal for getting the bullet

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असते. हे ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल करण्याची, वाटेल तेवढी मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. मग जेव्हा ते ध्येय साध्य होते, त्याचा आनंद काही औरच असतो. नव्वदच्या दशकात एका कबड्डी खेळाडुनेसुद्धा असेच ध्येय ठेवले होते. हे ध्येय होते भारतीय कबड्डी संघात स्थान मिळविण्याचे! आणि त्यासाठी त्याला बक्षीस मिळणार होती एक बुलेट. हा कबड्डी खेळाडू म्हणजे प्रो कबड्डी लीगमधील गुजरात फॉर्च्युन जायंट्स संघाचा प्रशिक्षक मनप्रीत सिंग. प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या कार्यक्रमात मनप्रीतने नुकतीच याबद्दल माहिती दिली.
मनप्रीत म्हणाला,
“लहान असताना मला अभ्यासात फारशी गती नव्हती. घरच्यांकडून मी यावरून अनेकदा मारही खाल्ला आहे. माझे अभ्यासात लक्ष नाही हे ओळखून अखेरीस माझे आजोबा सरदार पालसिंग यांनी मला कबड्डी खेळण्याची परवानगी दिली. त्यांनी मला पतियाळा येथील प्रशिक्षक शेरसिंग यांच्याकडे कबड्डीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. शेरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मी सरावही सुरु केला. मात्र त्या कष्टांची सवय नसल्याने मी काही दिवसांतच तिथून घरी पळून आलो.”
“अर्थातच या गोष्टीचे माझ्या आजोबांना वाईट वाटले. त्यांनी पुन्हा एकदा मला शांतपणे समजावून सांगितले. जर पुढे जाऊन भारतीय कबड्डी संघात स्थान मिळवले तर मी तुला बुलेट घेऊन देईल असे ते म्हणाले. आपल्याला आता काहीही करून बुलेट मिळवायचीच असा चंग मनाशी बांधून मी पुन्हा पतियाळाला आलो. आता मी प्रचंड मेहनत घेऊ लागलो. जास्तीत जास्त सराव करू लागलो.लवकरच मी पंजाबकडून खेळू लागलो.”
“पंजाबकडून वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळत असताना त्यावेळचे भारतीय संघाचे प्रशिक्षक ई प्रसाद राव यांनी माझा खेळ पाहिला आणि भारताकडून खेळण्याची ऑफर दिली. भारतीय संघातील स्थानाबरोबरच त्यांनी मला नोकरीचीसुद्धा हमी दिली.”
“भारतीय संघात समावेश झाल्यावर मी ६ महिने घरी गेलोच नाही. गुजरातमधील गांधीनगर येथे भारतीय संघाचे सराव शिबीर पार पडले होते. त्यानंतर झालेल्या स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळवले. जेव्हा हे सुवर्णपदक माझ्या आजोबांना दाखवले त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी नवीकोरी बुलेट खरेदी करून मला ती भेट म्हणून दिली. आजोबांनी दिलेली ही बुलेट आजही माझ्याकडे आहे. माझा छोटा भाऊ सोडल्यास इतर कुणाला मी ती चालवू देत नाही.  आजोबांची ही निशाणी मी आयुष्यभर जपणार आहे.”
मनप्रीत प्रो कबड्डीत पटना पायरेट्सकडून एक हंगाम खेळला. या हंगामात त्याने पटना संघाचे नेतृत्व करत त्यांना विजेतेपद मिळवून दिले.