अजय ठाकूर आणि प्रियांका नेगी म्हणतात, “से नो टू ड्रग्ज” 

Ajay Thakur and Priyanka Negi appeal, "Say no to drugs"

भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डी लीगमधील आघाडीचा खेळाडू अजय ठाकूर सध्या हिमाचल प्रदेश पोलीस दलासाठी सध्या डीएसपी पदावर काम करत आहे. करोनामुळे कबड्डीच्या स्पर्धा बंद असताना अजय डीएसपी म्हणून आपले कर्तव्य बजावतो आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला अजयने बिलासपूरमधील नागरिकांना करोनाच्या साथीदरम्यान घरी राहण्याचे आवाहन केले होते. आता अजय हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना एक आवाहन करतो आहे.
दरवर्षी २६ जून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अजयने या निमित्ताने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक खास व्हिडीओ पोस्ट करत हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये अजयने अमली पदार्थविरोधी दिनाचे महत्व समजावून सांगितले आहे. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. यामध्ये युवकांबरोबरच युवतींचाही समावेश आहे. याबरोबरच अजयने नशा केल्याचे काय काय दुष्परिणाम होतात हेही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. यासाठी जागरूकता वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश पोलीस दलाने एक टोल फ्री नंबर आणि एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरु केल्याचे अजयने सांगितले.अजय प्रो कबड्डी लीगमध्ये तमिळ थालयव्हाज संघाकडून खेळतो.
हिमाचल प्रदेश महिला कबड्डी संघांची कर्णधार प्रियांका नेगी हीने सुद्धा असाच व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हिमाचल प्रदेश राज्यात होणारा अमली पदार्थांचा व्यापार थांबवण्यासाठी नागरिकांनी हिमाचल पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन तिने केले आहे. याबरोबरच युवकांनी क्रीडा क्षेत्राकडे वळून स्वतःचा फिटनेस सुधारवण्याकडे लक्ष द्यावे असेही ती म्हणाली. प्रियांकाने यावर्षी पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशचे नेतृत्व केले होते.