एक वेळ ऑपरेशनला पैसे नव्हते, आता बनलाय प्रो कबड्डी स्टार 

At one time, he had no money for surgery. Now he is a PKL star 

प्रो कबड्डी लीगची सुरुवात २०१४ मध्ये झाली. या पहिल्या हंगामात भारताचे अनेक स्टार खेळाडू होते. या सगळ्या खेळाडूंमध्ये वयाने सगळ्यात लहान असा एक खेळाडू होता. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून तो प्रो कबड्डी पर्यंत पोहोचला होता. तो खेळाडू म्हणजे श्रीकांत जाधव. मात्र प्रो कब्बडी लीगचा पहिला हंगाम सुरु होण्याअगोदर काही दिवस श्रीकांतला दुखापत झाली आणि त्याचे प्रो कबड्डीत खेळण्याचे स्वप्न भंगले. स्वतः श्रीकांतने याबद्दल माहिती दिली. तो युपी योद्धा संघाच्या मॅट और मसाला चाय या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
यावेळी बोलताना श्रीकांत म्हणाला,
“मला जयपूर पिंक पँथर्स संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते. त्यावेळी मी प्रो कबड्डी लीगमधील सगळ्यात कमी वयाचा खेळाडू होतो. मात्र हंगाम सुरु होण्याअगोदर चार दिवस मला दुखापत झाली. दुखापत बरीच गंभीर होती. ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मला संघाने एकही सामना न खेळता मुक्त केले. मी माझ्या घरी आलो. माझ्याकडे ऑपरेशन करायला पैसेही नव्हते. मी दोन तीन डॉक्टरांचे मत घेतले मात्र  सगळ्यांनी ऑपरेशन करावेच लागेल असे सांगितले. अखेरीस मी माझे मित्र, नातेवाईक, काही इतर लोकांकडून पैसे उधार घेऊन ऑपरेशन करून घेतले. ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी करणे अतिशय महत्वाचे असते. माझ्याकडे त्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. शेवटी मी घरीच वेगवेगळे व्यायाम करून स्वतःची फिजिओथेरपी केली आणि माझा हात बरा केला. बरा होऊन मी पुन्हा कबड्डीला सुरुवात केली. याहीवेळी नितीन मदने हा माझा मित्र माझ्या मदतीला धावून आला.मला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी त्याने माझी बरीच मदत केली.”
“मी मुंबईत एक स्पर्धा खेळलो. दोन वर्षांनी मला महिंद्रा अँड महिंद्रा संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी पहाटे ३ वाजता उठून सराव करत असे. कंपनीने मला सर्व सुविधा पुरवल्या. त्यामुळे मी सरावात कोणतीही कसर ठेवली नाही. याचवेळी मी पुन्हा एकदा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सराव करू लागलो. तिथूनच माझी कारकीर्द पुढे जाण्यासाठी भरपूर मदत झाली.”
श्रीकांत सध्या युपी योद्धा संघाकडून प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. त्याने सातव्या हंगामात युपी योद्धाकडून सर्वाधिक गुण (१५२) मिळवण्याची कामगिरी केली होती.