अनुप, मनजीत नाही तर हा खेळाडू आहे श्रीकांतचा आदर्श

Not Anup or Manjeet, this player is Srikant's role model

प्रत्येक खेळाडूचा एक काहीतरी आदर्श असतो,प्रेरणा असते. त्याकडे बघत अनेक खेळाडू आपली कारकीर्द सुरू करतात.भारताचा आणि प्रो कबड्डी लीगमधील संघ यूपी योद्धाचा आघाडीचा खेळाडू श्रीकांत जाधव याची गोष्ट काही वेगळी नाही. आपला आदर्श खेळाडू कोण? कुणाकडे बघून आपल्याला कबड्डी खेळण्याची प्रेरणा मिळाली? याबाबद्दल श्रीकांतने नुकतेच भाष्य केले.तो यूपी योद्धा संघाने आयोजित केलेल्या मॅट और मसाला चाय या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.

यावेळी बोलताना श्रीकांत म्हणाला,

“भारताचा माजी कर्णधार, अर्जुन पुरस्कार विजेता पंकज शिरसाटला मी माझा आदर्श मानतो.त्याच्याकडे बघूनच मी कबड्डी खेळायला सुरुवात केली. पंकज हा सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. सध्या तो मुंबईत डीवायएसपी म्हणून काम करत आहे.”

पंकज शिरसाटने सात वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा कबड्डी विश्वचषक जिंकला होता.

यावेळी बोलताना श्रीकांतने आपल्या आयुष्यात कबड्डीची सुरुवात कशी झाली याबद्दलही माहिती दिली. तो म्हणाला,
“माझी सुरुवात खरं तर अॅथलेटिक्सने झाली. त्यानंतर मी कबड्डीकडे वळलो. घरची परिस्थिती बेताची असल्याने मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. कबड्डी खेळतानाच मी मुंबईत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आलो. तिथे केवलचंद सुतार आणि सुषमा सहस्रबुद्धे या प्रशिक्षकांनी माझी निवड केली. येथेच मला नितीन मदनेसुद्धा भेटला. त्यावेळी नितीन स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त मेहनत घेत असे. तो माझ्याकडून सराव करून घेत असे आणि स्वतःही करत असे.”
पुढे जाऊन श्रीकांत महाराष्ट्रा आणि विदर्भाकडून राष्ट्रीय स्पर्धेत खेळला.