जेव्हा कबड्डीतील दिग्गजाकडून चाहतीला मिळतात वाढदिवसाच्या शुभेच्छा

When Kabaddi Legend makes a fan's birthday extra special

खेळाडू आणि त्यांचे चाहते सगळीकडेच पहायला मिळतात. अनेकदा आपल्या आवडत्या खेळाडूसाठी चाहते करत असलेल्या गोष्टींची चर्चा होताना दिसते. आपल्या आवडत्या खेळाडूच्या एका भेटीसाठी, त्याच्याबरोबरच्या एका संभाषणासाठी चाहते वाटेल ते करायला तयार असलेले दिसतात. आपल्या आवडत्या खेळाडूच्या वाढदिवशी चाहते विविधप्रकारे त्यांना शुभेच्छा देताना दिसतात. आज मात्र काहीशी वेगळी गोष्ट घडलेली दिसली.
भारताचा कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमार याने आपली चाहती योगिता वालावलकर हिला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपने इंस्टाग्रामवर पोस्ट करत योगिताला शुभेच्छा दिल्या. अनुपच्या चाहत्यांना योगिताचे नाव नवे नाही. स्वतः योगिता ही अनुपच्या खेळाची विशेषतः कर्णधार म्हणून त्याच्या खेळाची मोठी चाहती आहे.
योगिता ही स्वतः कबड्डी खेळाडू होती. आता कबड्डी खेळत नसली तरी कबड्डीच्या सगळ्या घडामोंडीवर तिची नजर असते. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाच्या अंतिम फेरीचा सामना तिने पाहिला होता. तेव्हापासून ती अनुपची कट्टर चाहती बनली. दोन वर्षांपूर्वी मालवण-मुंबई- पुणे असा प्रवास करत ती अनुपला भेटण्यासाठी पुण्यात आली होती. प्रवासात सगळे पैसे खर्च झाल्याने आता आपल्याला अनुपचा खेळ बघायला मिळणार नाही म्हणून योगिता निराश झाली. मात्र आपल्यासाठी एवढे करणाऱ्या आपल्या चाहतीला नाराज करायचे नाही म्हणून अनुपने खास परवानगी काढून तिला सामना बघण्याची संधी दिली होती. आज वाढदिवसाच्या निमित्ताने खेल कबड्डीशी बोलताना योगिताने ही माहिती दिली.

यावेळी योगिताने तिने स्वतः केलेल्या कवितांचे पुस्तक अनुपला भेट म्हणून दिले होते. योगिताने आजवर अनुपवर तब्बल २५१ कविता केल्या आहेत. योगिता आणि अनुपची भेट झाली त्याच्या दोन दिवस आधीच अनुपने आपला वाढदिवस साजरा केला होता. मात्र आपल्या चाहतीबरोबर अनुपने पुन्हा एकदा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. योगिता स्वतःला अनुपियन असे म्हणवून घेते. तिला इंस्टाग्रामवॉर तब्बल २८ हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत.