पवनसारखी ‘लायन जंप’ मारायची असेल तर हे करा 

Do this if you want to do a ‘lion jump’ like Pawan

पवन कुमार सेहरावत आणि त्याची लायन जंप हे समीकरण कबड्डीच्या चाहत्यांना नवे नाही. प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात पटना पायरेट्सविरुद्धच्या सामन्यात पवनने ही जंप मारली होती. यावेळी पवन जमिनीपासून जवळपास ६ फूट उंचीवर हवेत होता. या रेडनंतर पवनची लायन जंप प्रचंड प्रसिद्ध झाली. कबड्डी खेळणाऱ्या अनेक तरुणांना आपल्यालासुद्धा पवनसारखी लायन जंप मारता आली पाहिजे असे वाटते. लायन जंप मारण्यासाठी नक्की काय करणे गरजेचे आहे याबद्दल स्वतः पवनने नुकतीच माहिती दिली. तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
यावेळी बोलताना पवन म्हणाला,
“जंप मारायची असेल तर सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे तुमचे कोअर मसल मजबूत हवेत. कोअर मसल मजबूत असतील तर तुम्ही सहज जंप मारू शकता. त्यामुळे मी दररोज कोअर मसल्सचे व्यायाम करतो. सध्याच्या परिस्थितीत सराव करता येत नाही. मात्र मी कोअरचे व्यायाम करत असतो. हे केल्याने जेव्हाकधी मी पुन्हा मॅटवर उतरेल तेव्हा मला आधीसारखीच जंप मारून सुरुवात करता येईल.”
“जंप करताना फक्त कोअर मसल्स मजबूत असून चालत नाही. तुम्ही लँडिंग कसे करता आहात हेदेखील तितकेच महत्वाचे असते. लँडिंग करताना तुम्ही खांद्यावर पडलात किंवा हातावर पडलात तर दुखापत होऊ शकते. त्यामुळे जंप केल्यानंतर लँडिंग कसे होतेय याकडेही लक्ष द्यावे लागते. यासाठी शरीराचा वरचा भाग मजबूत असणे गरजेचे आहे.”
पवनच्या या उंच उडी मारण्याच्या क्षमतेमुळेच त्याला ‘हाय फ्लायर’ हे टोपण नाव मिळाले.पवनने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयरचा किताब जिंकला होता. सातव्या हंगामात त्याने सर्वाधिक ३६० गुण नोंदवले होते.”