हे खेळाडू बनू शकतात प्रो कबड्डीचे एक हजारी मनसबदार
These players can join 1000 club of Pro Kabaddi

आजपर्यंत प्रो कबड्डी लीगचे सात हंगाम पार पडले आहेत. या सात हंगामाच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास केवळ दोन खेळाडूंना १००० गुणांचा टप्पा गाठता आला आहे. ते दोन खेळाडू म्हणजे परदीप नरवाल आणि राहुल चौधरी. परदीपने आत्तापर्यंत ११६९ तर राहुलने १०१४ गुण नोंदवले आहेत. या लेखात आपण नजर टाकणार आहोत अशा खेळाडूंवर की जे येणाऱ्या हंगामात एक हजार गुणांचा टप्पा गाठू शकतात.
१. दीपक निवास हुडा –
प्रो कबड्डी लीगमध्ये सर्वाधिक गुण नोंदविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दीपक सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ९४३ गुण मिळवले आहेत. दिपकला १००० गुणांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ ५७ गुणांची आवश्यकता आहे. दिपकचा आजवरचा फॉर्म पाहता हा टप्पा गाठणे त्याच्यासाठी फारच सोपे काम असणार आहे. दिपकने गेल्या सलग तीन हंगामात सतत १५० हुन अधिक गुण मिळवले आहेत. तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. प्रो कबड्डी लीगमधील सामन्यांची संख्या विचारात घेता दीपक सुरवातीच्या ८-९ सामन्यांत १००० गुणांचा टप्पा गाठू शकेल.
२. अजय ठाकूर –
भारताचा माजी कर्णधार असलेला अजय ठाकूर प्रो कबड्डी लीगमधील एक स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपल्या उंचीचा योग्य वापर करत गुण घेण्याचे त्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. अजयने आजतागायत ८११ गुण नोंदवले आहेत. गेल्या हंगामात दुखापतीमुळे अजयने फक्त १३ सामने खेळले होते. मात्र पाचव्या आणि सहाव्या हंगामात त्याने प्रत्येकी २०० हून अधिक गुण नोंदवले होते. एक हजार गुणांचा टप्पा गाठण्यासाठी अजयला १८९ गुणांची गरज आहे. अजयने येत्या हंगामात त्याच्या क्षमतेनुसार खेळ केल्यास त्याला हा टप्पा गाठणे अवघड जाणार नाही असे वाटते.
३. पवन कुमार सेहरावत –
प्रो कबड्डी लीगमध्ये सर्वाधिक गुण नोंविणाऱ्या खेळडूंच्या यादीत पवन सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्याने ७१६ गुण नोंदवले आहेत. म्हणजेच १००० गुणांचा टप्पा गाठण्यासाठी पवनला तब्बल २८४ गुणांची गरज आहे. पवनचा गेल्या दोन हंगामातील फॉर्म बघता तो येत्या हंगामात १००० गुणांचा टप्पा गाठू शकतो. त्याने प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात २८२ तर सातव्या हंगामात तब्बल ३६० गुणांची कमाई केली होती. हगेल्या दोन हंगामातील आपला फॉर्म कायम ठेवल्यास पवन १००० गुणांचा टप्पा गाठू शकेल अशी आशा वाटते.