प्रो कबड्डी चाहत्यांसाठी मोठी बातमी
Big news for Pro Kabaddi fans

करोनामुळे यावर्षी अनेक क्रीडास्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.भारतातील अतिशय प्रसिद्ध असलेली प्रो कबड्डी लीगही ह्याला अपवाद नव्हती. जुलै २०२० महिन्यात सुरू होणारा प्रो कबड्डी लीगचा हंगाम पुढे ढकलण्यात आला होता. करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रो कबड्डी नक्की कधी सुरू होणार याबाबद्दल प्रश्नचिन्ह होते. लीगचे चाहतेसुद्धा आतुरतेने याची वाट पाहत होते.
प्रो कबड्डी लीगच्या या सर्व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार नुकतीच भारतीय कबड्डी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली.लॉकडाऊनमुळे अर्थातच ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.या बैठकीत प्रो कबड्डी लीगचा हंगाम कधी सुरु करता येऊ शकतो याबद्दल चर्चा करण्यात आली.लीगचे आयोजन करायचे झाल्यास कोणत्या निकषांवर आधारित करता येईल याबाबद्दलसुद्धा या बैठकीत विचारविनिमय झाला. बैठकीच्या अखेरीस यावर्षीचा प्रो कबड्डी लीगचा हंगाम नोव्हेंबर-डिसेंबर २०२० दरम्यान आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रो कबड्डी लीगचे सामने चाहत्यांच्या अनुपस्थितीत घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.त्यामुळे सध्यातरी चाहत्यांना घरात बसूनच सामन्यांचा आनंद घ्यावा लागणार आहे.तसेच ज्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमीत कमी असेल त्या राज्यात लीगचे आयोजन करण्याचे ठरले आहे.तसेच संपूर्ण लीग एकाच शहरात आयोजित करण्यात येईल. सर्व खेळाडूंचे लीगच्या आधी १४ दिवस विलगीकरण करण्यात येईल.
लीगचे आयोजन न केल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी फेडरेशनने हा निर्णय घेतल्याचे समजते.