कबड्डीपटूंचे टॅटू प्रेम

Kabaddi players and their love for the Tattoos

प्रो कबड्डी सुरु झाली आणि रातोरात अनेक खेळाडूंचे नशीब पालटून गेले. याआधी फारसे कुणी ओळखत नसलेल्या खेळाडूंना आता चाहते ओळखू लागले. खेळाडू जातील तिथे चाहते त्यांच्याभोवती गर्दी करू लागले.

थोडक्यात खेळाडू आता सेलेब्रिटी झाले. सेलेब्रिटी म्हटलं की मग तसे राहणे गरजेचे झाले. याआधी कधी कबड्डी खेळाडू आपली हेअरस्टाईल, आपले कपडे कपडे याकडे फारसे लक्ष देत नसत. आता मात्र चित्र वेगळे आहे. काही खेळाडू तर कपडे, हेअरस्टाईल यांच्याबरोबरच अंगावर टॅटूसुद्धा करून घेतात. या लेखातून असेच काही खेळाडू आणि त्यांचे टॅटू याबद्दल माहिती घेणार आहोत.

विशाल माने –
प्रोकबड्डीचे सगळे सात हंगाम खेळणाऱ्या काही निवडक खेळाडूंपैकी एक म्हणजे विशाल माने. मॅटवर आपल्या असण्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर वचक ठेवणारा खेळाडू म्हणून विशालचे नाव घ्यावे लागेल. विशालने आपल्या शरीरावर पाच टॅटू केले आहेत. आपली मुलगी प्रिशा, मुलगा अर्जुन यांची नावे तसेच आपल्या आईसाठी खास मराठीत ‘आई’ असा टॅटू त्याने करून घेतला आहे. त्याच्या उजव्या दंडावर एक टॅटू आहे. विशालच्या डाव्या हातावर असलेला टॅटू खास आहे. या एकाच टॅटूमध्ये त्याच्या घरातील सगळ्यांच्या म्हणजे आई, वडील, मोठा भाऊ, विशाल स्वतः, त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावांची आद्याक्षरे आहेत.
विशाल प्रोकबड्डीत विशाल यु मुंबा आणि पटना पायरेट्सकडून विजेता झाला आहे. सध्या तो दबंग दिल्ली संघाकडून खेळतो.
मनिंदर सिंग –
प्रोकबड्डीच्या गेल्या हंगामातील विजेता संघ बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंग हा त्याच्या स्टाईलसाठीसुद्धा बराच प्रसिद्ध आहे. त्याची हेअरस्टाईल अनेक तरुणांना भुरळ घालते. प्रोकबड्डीतील निवडक स्टायलिश खेळाडूंमध्ये मनिंदरचे नाव घेतले जाते. मनिंदरने आपल्या शरीरावर चार पाच टॅटू करून घेतले आहेत. त्याच्या उजव्या दंडावर चित्त्याचा टॅटू आहे तर हातावर स्वतःचे नाव मणी लिहिलेले आहे. त्याच्या मानेवर त्याची पत्नी सिमरन हिच्या नावाचे आद्याक्षर टॅटू केलेले आहे. याबरोबरच त्याच्या पायावरही त्याने टॅटू करून घेतला आहे. नुकताच त्याने आपला उजव्या दंडावरील टॅटू मोठा करून घेतला आहे.
मनिंदरने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सकडूनही विजेतेपद मिळवले होते.
रण सिंग – 
कबड्डीचा स्टाईलभाई म्हणून रण सिंगचे नाव घेतले जाते. मॅटवरील कबड्डी खेळण्याआधी तो सर्कल कबड्डी खेळत असे. सर्कल कबड्डी खेळताना २०१० मध्ये त्याला कॅनडाला जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने आपला पहिला टॅटू करून घेतला. त्यावेळी त्याने आपल्या उजव्या दंडावर चित्त्याचा टॅटू करून घेतला. रन सिंग आणि मनिंदर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. रन सिंगने केलेला टॅटू बघून मनिंदरने सुद्धा तसाच टॅटू करून घेतला होता. जयपूर पिंक पँथर्सकडून खेळताना अगदी अभिषेक बच्चनने देखील त्याच्या टॅटूचे कौतुक केले होते.
रण सिंगने जयपूरकडून प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.

सुरेंदर नाडा – 

कबड्डीच्या मॅटवर प्रतिस्पर्धी खेळाडूंचे अँकल होल्ड करत त्यांना अडचणीत आणण्यासाठी सुरेंदर नाडा प्रसिद्ध आहे. सीआयएसएफ मध्ये नोकरी करणाऱ्या सुरेंदरने एक अशी गोष्ट केली आहे की जिचा त्याच्या संघ सहकाऱ्यांनी विचारही केला नाही. सुरेंदरच्या शरीरावर ‘ कबड्डी’ लिहिलेले दोन टॅटू आहेत. ह्यापैकी एक त्याच्या उजव्या हातावर तर दुसरा त्याच्या मानेवर डाव्या बाजूला आहे.दोन्ही टॅटूमध्ये कबड्डी हाच शब्द का याबाबद्दल सुरेंदर सांगतो, “ज्या खेळाने मला सर्वस्व दिले तो खेळ माझ्यासाठी काय आहे हे मला या टॅटूमधून दाखवायचे आहे.”

सुरेंदरने भारताकडून २०१६ मध्ये विश्वचषक जिंकला. प्रो कबड्डीत त्याने यु मुंबाकडून विजेतेपद मिळवले होते. सध्या तो पटणा पायरेट्सकडून खेळतो.

रोहित राणा –
प्रोकबड्डीच्या चाहत्यांमध्ये आपल्या दाढीमुळे प्रसिद्ध असलेल्या रोहित राणाला टॅटूचीसुद्धा आवड आहे. त्याच्या उजव्या खांदयावर सिंहाचा टॅटू असून उजव्या हातावर चक्क आपली पत्नी दीपिका राजपूत हिचा चेहरा टॅटू करून घेतला आहे. मॅटवर असताना रोहितचे दोन्ही टॅटू जर्सीमुळे झाकले जातात. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्याचे हे टॅटू माहित नसतात.
रोहितने जयपूर पिंक पँथर्सकडून प्रो कबड्डीच्या  पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.
रोहित कुमार –
रोहित कुमार आणि त्याचे अक्षय कुमारवरील प्रेम जगजाहीर आहे. रोहितने वेळोवेळी अक्षय कुमारबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. अखेरीस २०१७ मध्ये एकदा त्याला आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटायची संधी मिळाली होती. रोहितला अक्षयबद्दल एवढे प्रेम आहे की त्याने आपल्या दंडावर अक्षय कुमारचा चेहरा टॅटू करून घेतला आहे.
रोहितने आपल्या पदापर्णाच्या हंगामातच एका सामन्यात ३२ गुण नोंदवत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासून प्रत्येक हंगामात त्याने १०० हुन अधिक गुण नोंदवले आहेत. त्याने बंगळुरू बुल्सकडून प्रो कबड्डीचे विजेतेपदसुद्धा मिळवले आहे.