पुन्हा अनुभवा प्रो कबड्डी फायनलचा थरार
Experience the thrill of Pro Kabaddi Final again

गेल्या २-३ महिन्यांपासून जगातील अनेक क्रीडास्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतातील प्रो कबड्डी लीगदेखील याला अपवाद नाही. यावर्षी प्रो कबड्डीचा हंगाम नक्की कधी सुरु होणार याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र प्रो कबड्डी लीग वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी इंस्टाग्राम लाईव्ह, फेसबुक लाईव्ह सेशनचा उपयोग केला आहे.
याचाच भाग म्हणून आता प्रो कबड्डी लीगच्या सातही हंगामाच्या अंतिम फेरीचे सामने टीव्हीवर पुनःप्रक्षेपित करण्यात येणार आहेत. प्रो कबड्डी लीगने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रविवार २४ मे पासून रोज सकाळी १०:३० वाजता एका अंतिम सामन्याचे हायलाईट्स स्टार स्पोर्ट्स २ आणि ३ वाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहेत. याबरोबरच स्टार स्पोर्ट्स फर्स्ट वाहिनीवरसुद्धा रोज सकाळी ९:३० वाजता हे हायलाईट्स दाखवले जातील.
दोन दिवसांपूर्वी प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी करोनानंतर प्रो कबड्डी लीगचे स्वरूप कसे असेल याबद्दल माहिती दिली होती. मात्र लीग नक्की कधी सुरु होईल याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते.