बर्थडे बॉय नितीन तोमरविषयी माहित नसलेल्या १० गोष्टी

१. नितीनचा जन्म ३० एप्रिल १९९५ मध्ये उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील मलकापूर या गावात शेतकरी कुटुंबात झाला.
२. त्याला कुस्तीची आवड होती. मात्र कुस्ती खेळण्यासाठी महर्षी दयानंद स्कुल या त्याच्या शाळेत पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तो कबड्डीकडे वळला.
३. नितीनच्या गावातून अनेक नामांकित कुस्तीपटू निर्माण झाले. अर्जुन पुरस्कार विजेते शोकेंद्र तोमर आणि राजीव तोमर हे त्याच्याच गावचे. याबरोबरच त्याचे चुलते प्रल्हाद आणि अशोक तोमर या दोघांनीही आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
४. कबड्डी केवळ छंद म्हणून खेळणाऱ्या नितीनने एका शालेय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याची ही कामगिरी बघून त्याच्या शिक्षकांनी त्याला कबड्डीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. नितीननेही गुरूंनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानत कबड्डीकडे मोर्चा वळवला.
५. लवकरच वयाच्या १६ व्या वर्षी नितीनने ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत उत्तर प्रदेशला सुवर्णपदक मिळवून दिले.
६. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामात नितीन बंगाल वॉरियर्सकडून तर चौथ्या हंगामात २०१६ साली पुणेरी पलटणकडून खेळला. पुढच्या हंगामात २०१७ साली तो युपी योद्धा संघाकडून खेळला. युपी योद्धाने तब्बल ९३ लाख रुपये खर्च करत नितीनला आपल्या ताफ्यात घेतले होते. पिंकपँथर्सने नितीनला आपल्या संघात सामील करून घेण्याची तयारी केली होती. त्यांनी नितीनसाठी ९० लाख रुपयांची बोली लावली होती. मात्र ऐन वेळी युपी योद्धाने जास्त रकमेची बोली लावत बाजी मारली. या हंगामात त्याने चढाईचे १७७ गुण मिळवत युपी योद्धाकडून सर्वाधिक गुण नोंदविण्याचा विक्रम केला.
त्यानंतर लगेचच २०१८ साली तो पुन्हा पुणेरी पलटण या आपल्या मूळ संघाकडे परतला. पुणेरी पलटणने बाय बॅक पर्याय वापरत १ कोटी २० लाखाला नितीनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. गेले दोन हंगाम तो याच संघाकडून खेळतो आहे.
Related Posts
७. प्रो कबड्डीत बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटण संघांसाठी केलेल्या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. अहमदाबाद येथे २०१६ मध्ये पार पडलेल्या कबड्डी विश्वचषकात इराणविरुद्धच्या डू ऑर डाय रेडमुळे नितीन प्रकाशझोतात आला. या सामन्यात भारत इराणविरुद्ध दोन गुणांनी पिछाडीवर असताना नितीनने चढाई करत २ गुण पटकावले आणि भारताला आघाडीवर नेले. भारताने हा विश्वचषक जिंकून हॅटट्रिक साधली होती.
८. इराणमध्ये २०१७ साली पार पडलेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाचा नितीन सदस्य होता.
९. नितीनची नौदलामध्ये कशी निवड झाली याची कहाणी रंजक आहे. नितीनचे वडील सांगतात, २०१२ साली नितीन धनोरा गावात कबड्डी खेळायला गेला होता. तिथे भारतीय सैन्यदल, वायुदल आणि नौदलाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. नितीनचा खेळ पाहून तीनही दलांच्या अधिकाऱ्यांनी नितीनसमोर आपल्याकडून कबड्डी खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. यातून नितीनने नौदलाची निवड केली. सध्या या नोकरीमुळे नितीन मुंबईत स्थायिक आहे.
१०. चढाई करताना अचानक वेग वाढवत बचाव करणाऱ्या खेळाडूकडे झेपावत एक हाताने त्याला बाद करून माघारी परतण्याची नितीनची कला वाखाणण्याजोगी आहे.
११. भाग मिल्खा भाग आणि दंगल हे आपले आवडते चित्रपट आहेत असे नितीन सांगतो. हे चित्रपट पाहून मला प्रेरणा मिळते असेही तो म्हणाला.
१२. नितीन जेव्हा घरी जातो तो तेव्हा शेतीच्या कामात घरच्यांना मदत करतो.